ट्रकमधून जनावरांची क्रूर वाहतूक उघडकीस; २५ गोवंशीय बैल जप्त,
ट्रकमधून जनावरांची क्रूर वाहतूक उघडकीस; २५ गोवंशीय बैल जप्त,
तालुका प्रतिनिधी : सुनील हिंगे, अल्लीपूर
अल्लीपूर गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अल्लीपूर पोलिसांनी बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करणारा ट्रक अडवून २५ गोवंशीय बैल जप्त केले. तपासणीदरम्यान त्यापैकी चार बैल मृत अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी नागपूर येथील रहिवासी तौसिफ कुरेशी उर्फ मोबीन शेख कुरेशी याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.१५ ते ८.३० वाजताच्या दरम्यान मौजा धोत्रा चौक येथे नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी संशयित ट्रक थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान ट्रकमध्ये २५ गोवंशीय बैलांची अत्यंत अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे आढळले. सर्व जनावरे लहान दोरीने घट्ट बांधलेली होती तसेच त्यांना चारा व पाणी देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती.
पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पाहणीत चार बैल मृत अवस्थेत आढळले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ (सुधारित २०१५), प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी २५ गोवंशीय बैल, टाटा कंपनीचा १० चाकी ट्रक आणि एक अँड्रॉइड मोबाईल फोन जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ३६.४० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये जनावरांची किंमत सुमारे ६.२५ लाख रुपये, ट्रकची किंमत ३० लाख रुपये आणि मोबाईल फोनची किंमत सुमारे १५ हजार रुपये आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विजयकुमार घुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदुळकर करीत आहेत. गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध आणि प्राण्यांवर क्रूरता करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.